राज्यातील राजकीय वातावरणात एक नवीन वळण आल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी ( Shivajirao Adhalarao Patil )अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे, असे सांगितले जात आहे. पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दौरा चालू असताना, आढळराव पाटील मात्र या कार्यक्रमात उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीने आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे, विशेषतः आढळराव पाटलांनी एकनाथ शिंदेंशी संबंध वाढवले आहेत का? याबाबतच्या चर्चेने जोर धरला आहे.
आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिरूर लोकसभा क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या सहभागाने स्पष्ट होत आहे की, आढळराव शिंदेंशी नजीक असलेले दिसतात, जेव्हा एकनाथ शिंदे भीमाशंकर दर्शनासाठी आले होते तसेच आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते तेव्हा आढळराव पाटील तिथे उपस्थित होते. यामुळे अजित पवारांच्या कार्यक्रमांमध्ये आढळराव पाटीलांची अनुपस्थिती विशेष जाणवली.
आढळराव पाटीलांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.त्यामागे विशेष कारण होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुतीच्या नेत्यांच्या जागावाटपाच्या चर्चेत अजित पवारांनी शिरूरची जागा मागितली होती, जी शिवसेना नेत्यांच्या आकांक्षेच्या विरुद्ध होती. हे लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवली होती.
दरम्यान, आढळराव पाटील यांच्या या बदललेल्या भूमिकेने अनेक चर्चांना उधाण दिले आहे. त्यांच्या नवीन राजकीय पद्धतीने,तसेच अजित पवारांच्या कार्यक्रमात अनुपस्थितीने आणि शिंदे यांच्या कार्यक्रमात उपस्थितीने, राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. अशा परिस्थितीत,आढळराव पाटील पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील का, याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे.