काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतेच आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. अमेरिकेत राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या व्यक्तव्यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.
यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहुल गांधींवर टीका करताना म्हणाले आहेत की, आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींवर टीका केली आहे. मतांसाठी आरक्षणावरुन कसा खोटा नॅरेटिव्ह केला हे राहुल गांधींच्या वक्तव्यातून दिसले आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर टीका करताना अमेरिकेत मूर्खपणे टिप्पणी करून राहुल गांधी यांनी देशद्रोह केला असे वक्तव्य केले आहे.
राहुल गांधींनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आज आंदोलन केले जाणार आहे. ‘काँग्रेस हटाओ, आरक्षण बचाओ‘चा नारा या आंदोलनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. अकोल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आंदोलन करणार आहेत तर मुंबईमध्ये आशिष शेलार आणि पंकजा मुंडे आंदोलन करणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये देखील हे आंदोलन होणार आहे. आज १२ वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस पक्षातर्फे देखील राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.