14 सप्टेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने देशाची अधिकृत भाषा म्हणून हिंदी स्वीकारली आणि या निर्णयाच्या स्मरणार्थ दरवर्षी आज 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस (Hindi Day) साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी हिंदी दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. याबाबत त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केलेली आहे. पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, “सर्व देशवासियांना हिंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,” यासोबत हिंदी दिनानिमित्त व्हिडीओ शेअर करत त्यांनी हिंदी भाषेचे महत्व जनतेला सांगितलेले आहे.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील हिंदी दिनानिमित्त जनतेला हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी देखील एक्सवर हिंदी दिनानिमित्त पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले आहेत की, या वर्षी हिंदीने देशाची अधिकृत भाषा म्हणून जनसंवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. सर्व भारतीय भाषा आपला अभिमान आणि वारसा आहेत, त्या समृद्ध केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. अधिकृत भाषा हिंदीचे प्रत्येक भारतीय भाषेशी अतूट नाते आहे. मला विश्वास आहे की सर्व भारतीय भाषांना सोबत घेऊन, अधिकृत भाषा हिंदी ही विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी योगदान देत राहील असे अमित शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
गुजराती असो, मराठी असो वा तेलुगू, प्रत्येक भाषा हिंदीला ताकद देते आणि हिंदी प्रत्येक भाषेला ताकद देते असे देखील अमित शाह यांनी पोस्टमध्ये म्हणले आहेत. तसेच गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदीला बळकट करण्यासाठी खूप काम झाले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हिंदीमध्ये भाषणे देऊन पंतप्रधान मोदींनी हिंदीचे महत्त्व जगासमोर मांडले आहे आणि आपल्या देशातही आपल्या भाषांबद्दलची आवड वाढवली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाकडून 2021 पासून दरवर्षी अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन केले जाते यावेळी या संमेलनादरम्यान शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे हिंदी आणि इतर भारतीय भाषांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारतीय भाषा अनुभाग’चे उद्घाटन करणार आहेत.