“आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक रॅली काढली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी डोडा जिल्ह्यात प्रचार करत असून प्रचारादरम्यान बोलताना विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोहब्बत की दुकान हा नारा दिला होता यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. “नफरत की दुकान’ चालवणाऱ्यांच्या मागे “मोहब्बत की दुकांन “(प्रेमाची दुकाने) च्या पाट्या लपलेल्या असतात असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले आहे.
आजकाल विरोधक आपल्या खिशात संविधानाचे पुस्तक ठेवतात. ते आपले दुष्कृत्य लपवण्यासाठी असे करत आहेत. त्यांनी संविधानाच्या आत्म्याचा अनादर केला आहे. भारताने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे, मात्र ज्यांनी संविधान आपल्या खिशात ठेवले आहे त्यांनी 75 वर्षांपासून आपल्यापैकी काहींना या अधिकारापासून वंचित ठेवले आहे, असे पंतप्रधान मोदी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हणाले आहेत.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर देखील पंतप्रधान मोदींनी टीका केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष येथे येऊन म्हणतात, ‘जर आम्हाला 20 जास्त जागा मिळाल्या तर मोदींसह भाजपचे सर्व नेते तुरुंगात गेले असते. यातूनच “काँग्रेसची विचारसरणी आणि हेतू काय आहे? हे स्पष्ट होते असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
यापुढे बोलताना, जम्मू आणि काश्मीरमधील कोणताही रहिवासी, त्याचा धर्म, प्रदेश आणि सांस्कृतिक संलग्नता विचारात न घेता, “भाजप सरकारसाठी प्राधान्य” असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. “मी तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्याची हमी देतो. केवळ भाजपच जम्मू आणि काश्मीर राज्याचा दर्जा मजबूत करू शकतो,” असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
“जम्मू कश्मीर हे देशातील असे राज्य आहे जिथे प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. जम्मू कश्मीरमध्ये भाजपने प्रत्येक गरीब कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे भाजपच्या जम्मू-कश्मीर युनिटने पंडित प्रेमनाथ डोगरा रोजगार योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. मेडिकल कॉलेज असो, एम्स असो किंवा आयआयटी, यासाठी जम्मू-काश्मीरमधील जागा अनेक पटींनी वाढल्या आहेत असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे सरकारही जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. भाजपचा संकल्प आणि तुमचा पाठिंबा जम्मू-काश्मीरला शांत, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यास मदत करेल. त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी तुम्ही भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून विधानसभेवर पाठवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केले आहे .
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे . 8 ऑक्टोबरला याची मतमोजणी होणार असून पहिल्या टप्प्यात डोडा, किश्तवाड आणि रामबन या तीन जिल्ह्यांतील 8 विधानसभा जागांवर विधानसभा निवडणुका होणार आहेत