Nitin Gadkari : केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. मात्र. त्यांनी ती ऑफर नाकारली, असल्याचे म्हंटले आहे. नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
काय म्हणाले नितीन गडकरी?
काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण त्याने मला, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. अशी ऑफर दिली होती. त्यावर मी त्यांना विचारले की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा? मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. ही तत्त्वच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असा किस्सा नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितला.
नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाची ऑफर नाकारली असल्याचे स्पष्ट केले असले तरी देखील यामुळे राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा गडकरींच्या नावाची चर्चा सुरु होऊ शकते. 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये पंतप्रधानपदाचा दुसरा कोणताही दावेदार उभा राहिला नव्हता. मात्र, गेल्या काही काळापासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांच्या नावांची पंतप्रधानपदासाठी चर्चा होत असते. यामध्ये आता नितीन गडकरी यांच्या नावाची भर पडली आहे.