Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहराच्या मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीनंतर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.
मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक, फर्ग्युसन रस्ता, गणेश रस्ता विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे.
शनिवारी गणेशभक्तांची मोठ्या गर्दी
शहरात काल शनिवारी अनेक खासगी कंपन्या, कार्यालये व महाविद्यालयांना असलेली सुट्टी आणि पावसाने दिलेली उघडीप, यामुळे गणेशभक्त मोठ्या संख्येने गणपती पाहण्यासाठी बाहेर पडले. सकाळपासूनच शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. ही गर्दी रविवारी सकाळपर्यंत कायम होती.
घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर देखावे पाहण्यासाठी पुणेकर दरवर्षी बाहेर पडतात. त्याचप्रमाणे यंदाही शुक्रवारी (ता. १३) मोठ्या संख्येने गणेशभक्त बाहेर पडले. शनिवारी मात्र सुट्टी असल्याने त्यापेक्षाही अधिक गर्दी पाहायला मिळाली. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची उत्सुकता सर्वत्रच असते. त्यामुळे या गर्दीत पुणेकरांप्रमाणेच अन्य गावांहून आलेल्या नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. आपल्या कुटुंबासह आलेले नागरिक, विद्यार्थ्यांचे घोळके, तरुण जोडपी हे ठिकठिकाणी दिसत होते.