PM Modi President murmu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मिलाद-उन-नबी निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत. X वर पोस्ट शेअर करत पीएम मोदींनी लिहिले, “ईद मुबारक! मिलाद-उन-नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा. सद्भाव आणि एकता सदैव टिकून राहो. सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदो.”
याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील शुभेच्छा देत म्हंटले आहे, “पैगंबर मुहम्मद यांनी समानतेवर आधारित मानवी समाजाचे उदाहरण घालून दिले.” त्यांनी आपल्या X वरील पोस्टमध्ये लिहिले, “मिलाद-उल-नबी, पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या शुभ मुहूर्तावर, मी सर्व देशवासियांना, विशेषत: मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देते. पैगंबर मोहम्मद (स.ए.) यांनी मानवी समाजावर आधारित एक अद्भुत उदाहरण ठेवले आहे. संयमाने सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवणही त्यांनी दिली आहे.
किरेन रिजुजू यांनीही दिल्या शुभेच्छा!
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजुजू यांनीही या प्रसंगी लोकांना शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणाले, “सर्वांना मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा! हा दिवस आनंद, प्रेम आणि एकजुटीच्या नवीन भावनेने भरलेला जावो.”
या प्रसंगी लोकांना शुभेच्छा देताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “सर्वांना ईद मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा. या चांगल्या प्रसंगी आपल्या जीवनात शांती, करुणा आणि समृद्धी येवो आणि सर्वांमध्ये एकता, सौहार्द, दयाळूपणा आणि सौहार्द वाढवा.” सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही शुभेच्छा देत म्हंटले, “ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”
ईद मिलाद-उन-नबीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पैगंबराचे जीवन, त्यांच्या शिकवणी, त्यांचे चारित्र्य साजरे करणे, कारण त्यांनी त्यांच्या शत्रूंनाही क्षमा केली. पैगंबरांची जयंती अगदी साधारणपणे साजरी केली जाते, यादिवशी उत्सव कमीत कमी ठेवतात.