Pune ganesh visarjan 2024 : आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची जाण्याची वेळ जवळ (ganesh visarjan) आली आहे. बाप्पाचे आगमन होऊन दहा दिवस झाले असून, पुण्यात आता गणपती विसर्जन मिरवणुकीची (Pune ganesh visarjan 2024) तयारी सुरु झाली आहे. ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन होते, त्याच जोशात बाप्पाला निरोप दिला जातो. अशातच विर्सजन सोहळ्यासाठी १७ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. पुण्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक खास गणपती विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर आता वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शिवाय, विसर्जन मिरवणूक पाहायला येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
पुण्यात १३ ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सोहळ्यानिमित्त १३ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था पोलिसांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे.
पार्कींग व्यवस्था
शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ, एसएसपीएमएस मैदान, स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता, पेशवे उद्यान, सारसबाग, पाटील प्लाझा, मित्रमंडळ, दांडेकर पूल ते गणेश मळा, नीलायम चित्रपटगृह, संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय मैदान, जैन हाॅस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता, मराठवाडा महाविद्यालय, नदीपात्र ते भिडे पूल,
पुणे शहरातील प्रमुख रस्ते उद्या वाहतुकीसाठी बंद
विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने लक्ष्मी रोड, टिळक रोड सह शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहेत. शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद असतील. पुण्यात सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे प्रमुख रस्ते
लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, शिवाजी रोड, जंगली महाराज रोड, एफ सी रोड, कर्वे रोड, प्रभात रोड
विसर्जन मिरवणुकीची माहिती मिळवण्यासाठी वापरा ‘हे’ ॲप
जर तुम्हाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची माहिती हवी असेल तर तुम्ही ती एका ॲप द्वारे मिळवू शकता. गणेश विसर्जनादिवशी ‘माय सेफ पुणे’ अॅपद्वारे बंदोबस्त आणि मंडळांची माहिती मिळवू शकता. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पोलिस मदत केंद्रे, पादचारी मार्ग यांची माहिती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तसेच विसर्जन मिरवणूक मार्ग, बंद रस्ते आणि मंडळांच्या मिरवणुकीबाबत सद्य:स्थितीची माहिती दिली जाणार आहे.