महाराष्ट्रात आज लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन (Ganpati Visarjan 2024) करण्यात येत आहे. मुंबईत (Mumbai) लालबागचा राजा, गणेश गल्लीतील सर्व प्रसिद्ध गणपती तसेच मानाचे सर्व गणपती यांची विसर्जन मिरवणूक काढण्यास सुरुवात झाली आहे. बाप्पाचा निरोप पाहण्यासाठी मुंबईमध्ये भाविकांची गर्दी होत असते. गणपतीचे विसर्जन लोक सोशल मीडियावर तसेच टेलिव्हिजनवर पाहत असतात. परंतु याचवेळी मुंबईतील जिओचे (Jio) नेटवर्क बंद झाले होते. यावरूनच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे तसेच मीडियावर अंबानींना ट्रोल देखील केले.
अनेकांनी याबाबत तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. मुंबईत राहणाऱ्या अनेकांनी ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करून तक्रारी केल्या आहेत. जिओ सर्व्हर डाऊनबाबत तब्बल 10 हजार पेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सकाळी 11.15 नंतर दुपारी 12.30 वाजेपर्यंत जिओ नेटवर्क डाऊन झाले होते.
याचसोबत जिओ फायबर आणि ब्रॉडबँड सर्व्हिसमध्येही तांत्रिक अडथळे आले होते सोशल मीडियावर याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. यावरून लोकांनी मुकेश अंबानी यांना देखील ट्रोल केले आहे. जिओ नेटवर्क बंद पडल्यानंतर तासाभराने पुन्हा सुरळीत झाले होते. परंतु जिओ नेटवर्क कशामुळे डाऊन झाले होते याचे स्पष्टीकरण अजून कोणीही दिलेले नाही.
दरम्यान, आता #Jiodown हा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.