PM Modi : जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका होत असून, त्याबद्दल मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जम्मू-काश्मीरच्या जनतेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. मी विधानसभेतील सर्व जनतेला मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीला बळकट करण्याचे आवाहन करतो. मी विशेषत: तरुणांना आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्याचे आवाहन करतो.” अशी पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीर मधील लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “आज मी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्या मतदारांना आवाहन करतो की, “सरकार स्थापन करण्यासाठी उत्साहाने मतदान करा, शिक्षण, रोजगार, महिलांचे सक्षमीकरण आणि या भागातील फुटीरतावाद संपवण्यासाठी कटिबद्ध राहा….आधी मतदान, मग अल्पोपाहार.” अशी पोस्ट अमित शहांनी आपल्या X या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेयांनीही जम्मू-काश्मीरमधील पहिल्या टप्प्यातील मतदानासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लोकांना मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. खर्गे यांनी लिहिले की, ‘जम्मू आणि काश्मीरचे लोक त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि खऱ्या विकासाच्या आणि पूर्ण राज्याच्या नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत. 24 विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होत असताना, आम्ही प्रत्येकाने आपला लोकशाही हक्क बजावून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. प्रत्येक मतामध्ये भविष्य घडवण्याची आणि शांतता, स्थैर्य, न्याय, प्रगती आणि आर्थिक सक्षमीकरणाचे युग आणण्याची शक्ती असते.’
खरगे यांनी पुढे लिहिले, ‘आम्ही प्रत्येकाला आवाहन करतो, विशेषत: पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी या महत्त्वाच्या निवडणुकीत सहभागी व्हावे. पहिल्यांदाच एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर झाले, तुम्ही मतदान कराल तेव्हा लक्षात ठेवा या नामुष्कीला जबाबदार कोण. आपण एकत्र येऊन जम्मू आणि काश्मीरसाठी उज्ज्वल भविष्य घडवू या, जिथे सर्व नागरिकांचा आवाज ऐकला जाईल.’
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात होणार मतदान
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानाच्या सुरुवातीलाच मतदान केंद्रांबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील 24 जागांवर मतदान होत आहे. त्यापैकी 16 जागा काश्मीरमध्ये आणि आठ जागा जम्मू प्रदेशात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. लक्षात घ्या जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच मतदान होत आहे.