राज्यात अजूनही गणपती विसर्जनाचा (Ganpati Visarjan 2024) जल्लोष सुरू आहे. मुंबई (Mumbai) पुणे (Pune) यासारख्या ठिकाणी अजूनही गणपती विसर्जन सुरू आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात भाविकांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या दिव्याज फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम राबवली जाते. आज या मोहिमेअंतर्गत अमृता फडणवीस समुद्रकिनारा साफ करण्यासाठी वर्सोवा येथे आहेत.
यावेळी अमृता फडणवीस यांच्यासोबत, मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. सकाळी साडेसहा वाजल्यापासून समुद्रकिनारा साफ करण्यास सुरुवात झाली आहे. अमृता फडणवीस यांच्या कामाचे कौतुक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
याच दरम्यान मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रसार माध्यमांशी बोलताना तुम्ही चौपाटीवरील कचरा साफ करता ही चांगली गोष्ट आहे परंतु राजकारणातील कचरा देखील साफ करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा असे भाष्य त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.
यापुढे बोलताना अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतले असून त्या मुलींसाठी जे काम करतात त्यामुळे मी आजपासून त्यांना मॅम अमृता नाही तर माँ अमृता फडणवीस म्हणेन. असे वक्तव्य देखील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
दरम्यान, यावेळी अमृता फडणवीस यांनी स्वच्छतेचा संदेशच दिला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की, आपण देवभक्त आहोत, देवाला स्वच्छता आणि सुंदरता आवडते. आपण जसे आपले घर सुंदर ठेवतो, तसाच आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपल्याकडे नद्या, तलाव, समुद्र पाण्याचे स्रोत आहेत त्यामुळे ते स्वच्छ ठेवले पाहिजेत.