Maharashtra Election : महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी, पक्ष मैदानावर सक्रिय दिसत आहेत. विधानसभेच्या तारखा जाहीर होण्याआधीच सदस्य एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे. भाजप नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
बापूसाहेब पठारे हे पुण्याच्या राजकीय पटलातील एक मोठे नाव आहे. पाठारे हे २००९ ते २०१४ या काळात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आता त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्याच मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. अशा परिस्थितीत भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला असून, त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
खरं तर त्यांनी गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये बोलताना, विधानसभा लढवणार असल्याचे म्हटले होते. तसेच तुतारीला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले होते. पठारे यांच्या या आवाहनानंतर ते लवकरच भाजपची साथ सोडतील असे बोलले जात होते. आणि ते लवकरच हाती तुतारी घेऊ शकतात असा अंदाज लावला जात होता.
अखेर यावर आज शिक्कामोर्तब झाला असून, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.