राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांनी स्पष्ट केले आहे की, केवळ महिला मुख्यमंत्री झाल्याने महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यांनी म्हटले की, खरे तर महिलांचे मुद्दे काय आहेत हे समजून घेणे आणि त्यांना सक्षमपणे हाताळणारे अजित पवार(Ajit Pawar) मुख्यमंत्री बनले पाहिजेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले की, त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही, त्यामुळे ते फक्त महायुतीवर टीका करत आहेत.
चाकणकर यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत विचारले की, “काँग्रेसने महिलांना संधी का दिली नाही?” त्यांच्या मते, गेल्या काळात काँग्रेस सत्तेत होती, आणि त्या काळात महिला मुख्यमंत्री द्यायला हव्या होत्या. सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करत त्यांनी गायकवाडांना शुभेच्छा दिल्या, परंतु त्यांनी काँग्रेसने या संदर्भात किती पुढाकार घेतला आहे, यावर सवाल उपस्थित केला आहे.
महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्यापासून महिलांची संघटना त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळल्याचे चाकणकर यांनी सांगितले. त्यांच्या मते, महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, जो अनावश्यक आहे. असे त्या म्हंटल्या आहेत.
रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले, परंतु इतरांवर टीका करून आपल्या योग्यतेचा दाखला देण्याचा प्रयत्न म्हणजे बालिशपणा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी महिलांना 50 टक्के संधी मिळण्याच्या गरजेवर जोर दिला आणि राज्यात महिलांचे नेतृत्व पुढे आणण्याचे आश्वासन दिले आहे.