Chandrashekhar Bawankule : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा ते भारत विरोधी वक्तव्य करतात. त्यांना काही दिवस परदेशात जाण्यावर बंदी घालावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांच्या पोटातील ओठावर आले आहे. राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असे खडसावून विचारू, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी मांडली.
बावनकुळे यांनी काल नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवसातील लेखाजोखा मांडला. यावेळी बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड किंवा खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे आपण समर्थन करत नाही. परंतु, राहुल गांधी यांनी देखील सांभाळून बोलावे, असा सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केले होते. अमेरिकेत त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठाला भेट दिली होती, तिथे विद्यार्थ्यांनी त्यांना आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता आणि विचारले होते की, हे किती दिवस सुरू राहणार? यावर राहुल गांधी म्हणाले होते, “जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. यासाठी भारत सध्या योग्य ठिकाण नाही.” त्यांच्या याच वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.