कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये (Jammu kashmir ) विधानसभा निवडणूक (Vidhansabha Elections 2024 ) होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर रोजी पार पडले आहे. या विधानसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज श्रीनगर (Srinagar) आणि कटरा (Katara ) येथे निवडणूक रॅलींना संबोधित करत होते. श्रीनगरमध्ये त्यांची प्रचार सभा पार पडली आहे. मोठ्या संख्येने लोक या प्रचार सभेला उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ असे वक्तव्य केले आहे.
श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये त्यांची पहिली प्रचार सभा पार नुकतीच पडली. या सभेत मोदी म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देऊ आणि हे फक्त भाजपच करू शकेल त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी मतदानाचे सर्व विक्रम मोडून भाजपला भरभरून मतदान करावे.’ असे भाष्य पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केले आहे.
याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले आहेत की, जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करायचे आहे. इथल्या तरुणांना इथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. आज संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू आहेत. मुलांच्या हातात पेन, वह्या आणि लॅपटॉप आहेत. आज, शाळांमध्ये आग लागल्याच्या बातम्या येत नसून आता नवीन शाळा, नवीन महाविद्यालये, एम्स, वैद्यकीय महाविद्यालये आणि आयआयटी बांधल्याच्या बातम्या येत आहेत असे वक्तव्य पंतप्रधानांनी यावेळी सभेत केले आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या कालावधीत 61.13 टक्के मतदान झाले आहे . तसेच आता दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.