पुण्यामध्ये (Pune) वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. ही वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी पुण्यामध्ये मेट्रो (Metro)सुरु करण्यात आली आहे. आता पुणेकर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोने प्रवास करत आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मेट्रोने लाखो लोकांनी प्रवास केला आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन (Ganpati Visarjan 2024) करण्यात येते. पुण्यामध्ये मोठ्या धूम धडाक्यात गणपती विसर्जन करण्यात येते. ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाची मिरवणूक पुण्यामध्ये काढली जाते. यावेळी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता गणपती विसर्जनादिवशी पुणे मेट्रोतून एकाच दिवसात साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
याआधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे पीएमपीएमएलवर अवलंबून होती. यानंतर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात मेट्रो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मेट्रो मार्गाचे लोकार्पण केले आहे. दरम्यान, गणपती विसर्जनादिवशी तीन लाख ४६ हजार ६३३ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. यामुळेच पुणे मेट्रोला गणपती विसर्जनादिवशी 54 लाख 92 हजार 412 रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.
तसेच गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत ६ लाखांपेक्षा जास्त पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. त्यामुळे पुणे मेट्रोला ३ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत 6 लाख 93 हजार 580 प्रवाशांनी प्रवास केला असून 3 कोटी 5 लाख 81 हजार 59 रुपयांचे उत्पन्न पुणे मेट्रोला मिळालेले आहे. पुणे मेट्रोने ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मध्यरात्रीपर्यंत सेवा दिली असून १७ आणि १८ तारखेला २४ तास पुणे मेट्रो सुरू ठेवण्यात आली होती.
दरम्यान, पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते शिवाजीनगर मार्गाचे काम पूर्ण झाले असून 27 सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्धघाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.