PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे ते क्वाड समिटमध्ये भाग घेणार आहेत. यावेळी ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ‘समिट ऑफ द फ्युचर’ (Summit of the Future) मध्ये भाषण देखील देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पंतप्रधानांच्या या दौऱ्याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 21 सप्टेंबर रोजी डेलावेअरमधील विल्मिंग्टन येथे होणारी क्वाड लीडर कॉन्फरन्स असेल. ही परिषद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या होमटाऊनमध्ये आयोजित केली जाणार आहे.
या कॉन्फरन्सला जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेही या उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, क्वाड नेत्यांच्या या बैठकीत गेल्या वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला जाईल आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आगामी वर्षासाठी योजनांचा आराखडा आखला जाईल.
22 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमधील नासाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियम येथे भारतीय समुदायाला संबोधित करतील. या कार्यक्रमाला ‘मोदी यूएस प्रोग्रेस टुगेदर’ असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी 24,000 हून अधिक भारतीयांनी नोंदणी केली आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी अमेरिकन कंपन्यांच्या प्रमुखांना भेटतील, ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम कंप्युटिंग, सेमीकंडक्टर आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य आणखी मजबूत होईल.
यावेळी मोदी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांमध्ये सक्रिय असलेल्या काही महत्त्वाच्या विचारवंत आणि इतर भागधारकांशी संवाद साधतील.
23 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ‘समिट ऑफ द फ्युचर’ मध्ये सहभागी होतील. ‘मल्टीलेटरल सोल्युशन्स फॉर अ बेटर टुमॉरो’ ही यावर्षीच्या परिषदेची थीम आहे.
या परिषदेत जगभरातील अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत, जे जागतिक समस्यांवरील बहुपक्षीय उपायांवर चर्चा करतील. यासोबतच पंतप्रधान मोदी परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करतील, ज्यामध्ये परस्पर हितसंबंधांवर चर्चा केली जाईल.