Tirupati Temple : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी मागील सरकारच्या काळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याच्या दावा केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यांच्या या दाव्यानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच राजकीय वाद देखील पेटला आहे.
अनेकजण याला राजकीय फायद्यासाठी केलेला आरोप म्हणत आहेत, तर काहीजण या प्रकरणात सीबीआयची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) ने चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचा अहवाल सादर केला आहे.
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अहवालानुसार, तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराच्या प्रसादात भेसळ झाल्याची पुष्टी केली आहे. प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे.
अहवालानुसार, प्रसाद म्हणून वाटण्यात येणारे लाडू बनवण्यासाठी गोमांस चरबी, फिश ऑईल आणि पाम ऑइलचा वापर केला जात असल्याचे टीडीपीने म्हटले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर सांगितले की, “तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस फॅट) मिसळली जात असल्याने आम्ही सर्वजण खूप त्रस्त आहोत. तत्कालीन वायसीपी सरकारला (Yuvajana Sramika Rythu Congress Party) या सर्वांची उत्तरे बोर्डाला द्यावी लागतील. आमचे सरकार यावर कारवाई करण्यास वचनबद्ध आहे. पण हे मंदिरे आणि इतर धार्मिक प्रथा यांच्या अपवित्रतेशी संबंधित अनेक समस्यांवर प्रकाश टाकते.”
पुढे ते म्हणाले, “आता राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, प्रसारमाध्यमे आणि राष्ट्रीय स्तरावर आपापल्या क्षेत्रातील इतर सर्व लोकांनी यावर चर्चा केली पहिले असे मला वाटते, आपण सर्वांनी एकत्र येऊन ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवला पाहिजे.” असंही पवन कल्याण यांनी म्हंटले आहे.