India Russia Relation : भारत (India) शस्त्रास्त्र निर्मात्यांद्वारे विकले जाणारे तोफगोळे युरोपियन (Europe) ग्राहकांच्या वतीने युक्रेनला पाठवल्याचा दावा करण्यात येत असून, रशिया (Russia) भारतावर नाराज असल्याचे म्हंटले जात आहेत. रशियाने याला अनेकवेळा विरोध केला तरी देखील भारताने असा व्यापार थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केलेला नाही, असे देखील आरोप भारतावर करण्यात आले आहेत.
मात्र, आता या अहवालाला भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याला “सट्टा आणि दिशाभूल करणारा” अहवाल असल्याचे म्हटले आहे. लष्करी आणि दुहेरी-वापराच्या वस्तूंच्या निर्यातीवरील आंतरराष्ट्रीय दायित्वांचे पालन करण्याचा भारताचा एक निर्दोष ट्रॅक रेकॉर्ड आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
रशिया युक्रेन युद्धावर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, ‘आम्ही ‘रॉयटर्स’चा अहवाल पहिला आहे. आणि तो काल्पनिक आणि दिशाभूल करणारा आहे. भारताने उल्लंघन केल्याचे अहवालात म्हटले आहे. पण असे काही नाही. हा अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे. लष्करी आणि दुहेरी वापराच्या वस्तूंच्या निर्यातीवरील आंतरराष्ट्रीय दायित्वांचे पालन करण्याचा भारताचा रेकॉर्ड निर्दोष आहे. आण्विक अप्रसाराशी संबंधित आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या लक्षात घेऊन आणि नियामक चौकटीच्या आधारे भारत आपली संरक्षण निर्यात करत आहे.
‘रॉयटर्स’ अहवालानुसार, रशियाच्या विरूद्ध युक्रेनच्या संरक्षण प्रणालीला समर्थन देण्यासाठी शस्त्रास्त्रांचे हस्तांतरण एका वर्षाहून अधिक काळ होत आहे. जुलै महिन्यात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी हा मुद्दा भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासमोर दोन वेळा उपस्थित केला असल्याचे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे. यावर आता परराष्ट्र मंत्रालयातून उत्तर आले आहे.
युक्रेनमध्ये शस्त्रे पोहोचल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हंटले?
जानेवारीमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांना युक्रेनमध्ये भारतीय शस्त्रे पोहोचल्याबद्दल विचारण्यात आले होते. भारताने युक्रेनला तोफगोळे पाठवलेले नाहीत किंवा विकलेही नाहीत, असे ते म्हणाले होते.
भारत सरकारमधील दोन आणि संरक्षण उद्योगातील दोन सूत्रांनी सांगितले की, युक्रेन वापरत असलेल्या दारुगोळ्यापैकी फारच कमी उत्पादन भारताने केले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाशी युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने आयात केलेल्या सर्व शस्त्रास्त्रांपैकी हे १ टक्के पेक्षा कमी असल्याचा अंदाज अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. मात्र, हा दारूगोळा युरोपीय देशांनी युक्रेनला विकला असल्याचे बोलले जात आहे. पण अद्याप याची पुष्टी झालेली नाही.
कोणता देश भारताची शस्त्रे युक्रेनला पाठवत आहे?
एक स्पॅनिश आणि एक वरिष्ठ भारतीय अधिकारी, तसेच भारताच्या माजी उच्च अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की, ‘इटली आणि Czechia हे युक्रेनला भारतीय शस्त्रे पाठवणाऱ्या युरोपीय देशांपैकी एक आहेत. हे युरोपियन युनियनचे दोन मोठे सदस्य देश आहेत जे युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रे पाठवत आहेत. तुमच्या माहितीसाठी, ‘यंत्र इंडिया’ ही सरकारी कंपनी आहे ज्याची शस्त्रे युक्रेनमध्ये वापरली जात आहेत.