Rahul Gandhi : जम्मू-काश्मीरमधील हटवण्यात आलेले कलम ३७० परत आणण्यासाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र असल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. ख्वाजा आसिफ यांनी एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले आहे. पाकिस्तान संरक्षणमंत्र्याच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस चांगलेच गोत्यात आले आहे. दरम्यान, ख्वाजा यांच्या मुलाखतीनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेस आणि पाकिस्तानचा हेतू एकच असल्याचे म्हंटले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानी पत्रकार हमीद मीरच्या शो कॅपिटल टॉकमध्ये ते म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 परत आणणे शक्य आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा मोठा प्रभाव आहे. अशा स्थितीत या युतीची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे….कलम 370 परत आणण्याबाबत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आणि पाकिस्तान एकमतावर आहेत.”
पाकिस्तान के रक्षा मंत्री का आर्टिकल 370 और 35A पर कांग्रेस और JKNC के समर्थन की बात ने एक बार फिर कांग्रेस को एक्सपोज कर दिया है। इस बयान ने पुनः यह स्पष्ट कर दिया है कि कांग्रेस और पाकिस्तान के इरादे भी एक हैं और एजेंडा भी। पिछले कुछ वर्षों से राहुल गाँधी देशवासियों की भावनाओं…
— Amit Shah (@AmitShah) September 19, 2024
याशिवाय ख्वाजा आसिफ यांनी असेही म्हटले की, “ही आघाडी सत्तेवर आल्यास पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध सुधारू शकतात. याचे कारण म्हणजे काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची धोरणे असतील, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या मुद्द्यावर वक्तव्य करत म्हंटले, काँग्रेस आणि पाकिस्तानचा हेतू आणि अजेंडा एकच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी देशवासीयांच्या भावना दुखावत प्रत्येक भारतविरोधी शक्तीच्या पाठीशी उभे आहेत.’
पुढे शाह म्हणाले, “एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणे असोत किंवा भारतीय लष्कराबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे असो, राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष आणि पाकिस्तान नेहमीच एकाच पानावर आहेत. काँग्रेसचा देशविरोधी शक्तींमागे कायम हात राहिला आहे. पण, काँग्रेस पक्ष आणि पाकिस्तान विसरले आहेत की, केंद्रात मोदी सरकार आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये कलम 370 किंवा दहशतवाद परत येणार नाहीत.’
या प्रकरणी काँग्रेसने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत, ‘पाकिस्तानने स्वतःच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावे.’ असा सल्ला दिला आहे.
ते म्हणाले की, पाकिस्तानचा आमच्याशी काहीही संबंध नाही आणि आम्ही त्यांचा भाग नाही. पाकिस्तानने आपली लोकशाही वाचवली पाहिजे आणि आम्हाला आमच्या लोकशाहीत सहभागी होऊ द्या. पाकिस्तानने भारताच्या निवडणुकीवर असे भाष्य करणे योग्य नाही. असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या संरक्षणमत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीरमध्ये बॅकफूटवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पाकिस्तानशी हातमिळवणी करत असल्याचे देखील आरोप केले जात आहेत.