सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections 2024 )पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. राज्यात सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून अनेक महिलांना आर्थिक मदत होत आहे. मध्य प्रदेशमध्ये ही योजना लाडली बहना योजना या नावाने सुरू आहे. आता सरकारकडून अनेक राज्यात ही योजना सुरू करण्यात येत आहे. हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीची देखील तयारी जोरदार सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपकडून या जाहिरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजना आणि अग्नीवीर युवकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे.
भाजपकडून निवडणूक संकल्पपत्र जाहीर करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar)तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी(Nayab Singh Saini) उपस्थित होते. हरियाणात लाडकी बहीण योजना सुरू करणार असल्याचे या संकल्प पत्रात सांगण्यात आले आहे. तसेच अग्नीवीर योजनेमुळे हरियाणातील युवकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती आता हीच नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून 2 लाख अग्नीवीर जवानांना हरियाणा सरकारमध्ये सामील करून घेतले जाईल असे सांगण्यात आले आहे.
याचसोबत पाच लाखांपर्यंतचे घरकुल ग्रामीण आणि शहरी भागात दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी 24 प्रकारच्या पिकांना किमान हमीभाव देण्यात येणार आहे. हरियाणातील गृहीणींना पाचशे रुपयात गॅस सिलेंडर पुरवला जाणार असल्याचे देखील या संकल्प पत्रात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 2014 मध्ये भाजपकडून 187 आश्वासने दिली गेली होती आणि ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. यामुळेच लोक आमच्यावर विश्वास ठेवत आहेत. हरियाणातील लोक काँग्रेसला कंटाळले असून आता सर्व लोक भाजपसोबत आहेत असे वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी यावेळी केले आहे.