Supreme Court : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता चॅनलवर सर्वोच्च न्यायालयाच्या जागी रिपल नावाचे चॅनल दिसत आहे. या चॅनलवर पूर्वी सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित व्हिडिओ होते. मात्र, आता क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्हिडिओ संपूर्ण चॅनलवर दिसत आहेत. नेमका काय आहे प्रकार? जाणून घेऊया…
सर्वोच्च न्यायालय सार्वजनिक हिताच्या प्रकरणांसंबंधी सुनावणीसाठी YouTube चॅनेल वापरते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे हे व्हिडीओ हॅकर्सनी खाजगी बनले आहेत. अशास्थितीत सुप्रीम कोर्टाचे हे चॅनेल हॅक झाल्याचे समजते. सध्या सुप्रीम कोर्ट प्रशासन यूट्यूब चॅनलच्या हॅकिंगची चौकशी करत आहे.
काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या घटनापीठातील खटल्यांमध्ये आपले कामकाज थेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला होता. लाइव्ह स्ट्रिमिंग कार्यवाही हा घटनेच्या कलम २१ नुसार न्याय मिळवण्याच्या अधिकाराचा भाग आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. सुनावणीचे लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी कोर्ट यूट्यूबचा वापर करत आहे. अलीकडेच, सुप्रीम कोर्टाने कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी यूट्यूबवर थेट प्रक्षेपित केली होती.
याच सुनावणीचा व्हिडिओ हॅकर्सनी प्रायव्हेट केला होता आणि ‘ब्रॅड गार्लिंगहाऊस: रिपल रिस्पॉन्स टू द एसईसी’च्या $2 बिलियन फाइन! एक्सआरपी प्राइस प्रीडिक्शन’ असे शीर्षक असलेला हा व्हिडीओ युट्यूब चॅनेलवर लाइव्ह केला.
या प्रकाणावर सुप्रीम कोर्टाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नेमके काय झाले याबद्दल आम्हाला खात्री नाही. मात्र वेबसाईटसोबत छेडछाड झाल्याचे स्पष्ट आहे. ते म्हणाले की, शुक्रवारी सकाळी सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ही समस्या दिसून आली आणि सुप्रीम कोर्टाच्या आयटी टीमने एनआयसी म्हणजेच नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरकडे मदत मागितली आहे.
आजकाल लोकप्रिय व्हिडिओ चॅनेलचे हॅकिंग मोठ्या प्रमाणावर असल्याने. रिपलने स्वतःच YouTube वर दावा केला आहे की, त्यांचे सीईओ ‘ब्रॅड गार्लिंगहाउस’चे बनावट अकाऊंट तयार करण्यापासून हॅकर्सना रोखण्यात त्यांना अपयश आले आहे.