आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र ( Narendra Modi )मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज वर्धा येथे पंतप्रधानांनी भेट दिली आहे. पी एम विश्वकर्मा योजनेला (PM Vishwakarma Scheme) एक वर्ष पूर्ण झाले असून या योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रम आज वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन देखील याठिकाणी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावलेला आहे.
राज्यात मोठ्या उत्साही वातावरणात गणेशोत्सवाचा कार्यक्रम पार पडला आहे. नुकतेच राज्यात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आहे. गणेशोत्सवादरम्यान कर्नाटकात दोन गटांतील वादातून गणपतीची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवण्यात आली होती यावरून पंतप्रधानांनी कर्नाटकात काँग्रेसने गणपतीला तुरुंगात टाकले अशा शब्दांत कॉँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मी गणेश पूजेला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे गेलो होतो तर काँग्रेसचे तुष्टीकरण धोरण आडवे आले आणि काँग्रेसचा जळफळाट झालेला दिसून आला. याचसोबत काँग्रेसने नेहमीच आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा व संस्कृतीचा अपमान केला आहे असे पंतप्रधान वर्ध्यातील कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.
काँग्रेस हा बेईमान व भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना कॉँग्रेसवर केला आहे. काँग्रेसने आजवर आपल्या संस्कृतीचा कधीच सन्मान केलेला नाही. त्यांनी जर आपल्या संस्कृतीचा, सन्मान केला असता तर त्यांनी गणेशोत्सवाचा, गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध केला नसता असे पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणालेले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांना ज्या कॉँग्रेस पक्षाने भरकटवले अशा कॉँग्रेस पक्षाला परत संधी देऊ नका. कॉँग्रेस सरकार खोटे, फसवणूक करणारे आणि बेईमानी आहे. महाराष्ट्रात आज जी काँग्रेस आहे, ती गांधींची नाही. आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचं भूत असून त्यांच्यामधील देशभक्ती संपली आहे असे देखील पंतप्रधान म्हणालेले आहेत.