राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची(Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडायचा थांबला होता पण आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई शहर (Mumbai )आणि उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. आज मुंबईमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
वादळ, वारा आणि विजांचा कडकडाटासह उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो असे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, बीड, नांदेड यासह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच आज परभणीत अनेक दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली आहे.अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून आज नागपूरचे कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 23°C असण्याची शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रातही आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोकणात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो तर राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असून या पावसामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला असून पुढील २ दिवसांत मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. आज छत्रपती संभाजीनगरचे कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 22°C असण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगण्यात येत आहे.