Pawan Kalyan : तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्या जात असल्याच्या वृत्तानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला हा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान, आता या प्रकरणी आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत 11 दिवसांच्या तपश्चर्या अर्थात उपवासाला जाणार असल्याचे सांगितले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात प्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबीचा वापर केल्याचा खुलासा केल्यानंतर हा गोंधळ उडाला.
तिरुमला लाडू प्रसादमच्या कथित अपवित्राचे प्रायश्चित करणार असल्याचे आता पवन कल्याण यांनी पोस्ट करत सांगितले. ते 22 सप्टेंबरपासून गुंटूर जिल्ह्यातील नांबूर येथील श्री दशावतार व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात 11 दिवसांची ‘प्रयासचित्त दीक्षा’ घेणार आहेत. तिरुपती लाडू प्रसादम यांच्या कथित अपमानाबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. जगन मोहन रेड्डी यांच्या आधीच्या सरकारच्या काळात घडलेल्या या घटनेने दुखावल्याचे पवन कल्याण यांनी सांगितले.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की ‘भगवान बालाजी! मला क्षमा कर प्रभु..अत्यंत पवित्र मानला जाणारा तिरुमला लाडू प्रसाद… पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या अनियंत्रित प्रवृत्तीमुळे अपवित्र झालाय. त्यांनी प्राण्यांच्या चरबीचे तेल वापरून दूषित केले होते. क्रूर मनाचे लोकच असे पाप करतात. हे पाप सुरुवातीला न ओळखणे म्हणजे हिंदू जातीवर कलंक लावण्यासारखे आहे. लाडूच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल असल्याचे समजताच मी अस्वस्थ झालो. मला स्वतःला अपराधी वाटते आहे. मी लोकहितासाठी लढत आहे. खेदाची गोष्ट म्हणजे अशी समस्या सुरुवातीला माझ्या लक्षात आली नाही.”
“सनातन धर्मावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने कलियुगातील भगवान बालाजींच्या या भयंकर दुष्कृत्याचे प्रायश्चित केले पाहिजे. याच भावनेने मी प्रायश्चित्त सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (२२ सप्टेंबर २०२४) सकाळी मी गुंटूर जिल्ह्यातील नांबूर येथील श्री दशावतार व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दीक्षा घेईन. 11 दिवस दीक्षा घेतल्यानंतर मी तिरुमला श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेईन. ‘देवा… मागच्या सरकारांनी तुझ्याविरुद्ध केलेली पापे धुण्याची मला शक्ती द्या.’
हमारी संस्कृति, आस्था, विश्वास और श्रद्धा की धर्मधुरी, श्री तिरुपति बालाजी धाम के प्रसाद में, कुत्सित प्रयासों के तहत, जो अपवित्रता का, संचार करने की कोशिश की गई, उससे मैं व्यक्तिगत स्तर पर, अत्यंत मर्माहत हूँ, और सच कहूं तो, अंदर से अत्यंत छला गया, महसूस कर रहा हूँ। प्रभु…
— Pawan Kalyan (@PawanKalyan) September 21, 2024
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले, “अशा प्रकारचे गुन्हे तेच लोक करतात, ज्यांचा देवावर विश्वास नाही आणि त्यांना पाप करण्याची भीती नाही. तिरुमला तिरुपती देवस्थानम प्रणालीचा भाग असलेल्या मंडळाचे सदस्य आणि कर्मचारी देखील तेथील चुका शोधू शकत नाहीत याचे मला दुःख आहे. त्यांना कळले तरी ते बोलत नाहीत. “असे दिसते की ते त्या काळातील राक्षसी प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांना घाबरत होते.”
दरम्यान, या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री पावन कल्याण यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची मागणी केली होती. आपण सर्वांनी एकत्र येऊन ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही पवन कल्याण यांनी म्हंटले आहे.