Maharashtra Rain News : महाराष्ट्रात काही भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी देखील काही भागात जोरदास पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर काही भागात मुसळधार पावसामुळे शेतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यात आजही विविध भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मराठवाड्यातील धाराशीव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर भंडारा गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा स्थितीत नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
याठिकाणी पावसाचा कहर
गेल्या दोन दिवसापासून परभणी शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. सलगच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे, तसेच काही भागातील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत रस्ते बंद असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, थोड्याशा विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात अनेक भागात पावसाच्या मध्यम आणि हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. तर पुणे, सोलापूर आणि साताऱ्यात देखील हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.