PM Modi in US : रविवारी न्यूयॉर्कमधील नासाऊ कोलिझियम येथे भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी AI (Artificial intelligence) ची नवी व्याख्या सांगितली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, AI म्हणजे अमेरिका-भारत. तसेच पुढे त्यांनी हे एआय जगाची खरी शक्ती असल्याचे म्हंटले आहे.
यावेळी मोदींनी अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांचे देखील कौतुक केले. तुम्ही लोकांनी भारताचे नाव उंचावले आहे. तुम्ही सर्वजण भारताचे ब्रँड अम्बेसेडर आहात. भारतमातेने जे आपल्याला शिकवले ते आपण कधीच विसरू शकत नाही. तुम्ही भारताला अमेरिकेशी आणि अमेरिकेला भारताशी जोडले आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, “जगासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, (Artificial intelligence) पण माझा विश्वास आहे की, एआय म्हणजे अमेरिका-भारत…ही नवीन जगाची शक्ती आहे. AI हे भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंची देत आहे.” पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर कार्यक्रमात उपस्थित हजारो भारतीयांनी मोदी…मोदी…च्या घोषणा दिल्या.
भारताला आपले वर्चस्व नको आहे, तर जगाच्या भरभराटीसाठी भूमिका बजावायची आहे, असेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले. तसेच जागतिक शांतता प्रक्रियेला गती देण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची असेल यावरही त्यांनी भर दिला. पुढे मोदी म्हणाले की, ‘आज भारताचे परराष्ट्र धोरण सर्वांशी समान अंतर राखण्याचे नसून समान जवळीकीचे आहे.’ तसेच ही युद्धाची वेळ नसून शांती पसरवण्याची वेळ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
संकटकाळी भारत मदतीसाठी प्रथम पोहचतो
कोविड-19 संकटादरम्यान भारताने 150 हून अधिक देशांना दिलेल्या मदतीचा हात दिला आहे, यावेळी मोदीपंतप्रधान म्हणाले, जगात जेव्हाही आपत्ती आली तेव्हा भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून पुढे आला आहे. भूकंप असो किंवा गृहयुद्ध, भारत तिथे आधी पोहोचतो.
पीएम मोदी म्हणाले, “जागतिक विकास आणि जागतिक शांततेच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची असेल.” जागतिक प्रभाव वाढवणे हे भारताचे ध्येय नसून जगाच्या समृद्धीमध्ये भूमिका बजावणे हे आहे.’ असेही स्पष्ट केले.
तुमच्या माहितीसाठी, रशिया आणि युक्रेन युद्ध रोखण्यात भारताची भूमिका महत्वाची असेल, दोन्ही देशांना विश्वास आहे की, भारत त्यांचे हे युद्ध लवकरात लवकर संपवेल. दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी देखील असाच विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वीही मोदींनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे.