अमरावतीमधून (Amravati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी प्रवासी बसचा अपघात झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर घडली आहे. सेमाडोहजवळील वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पूलाखाली कोसळल्याचा प्रकार घडला आहे. बस अपघाताची ही घटना सकाळी 8 वाजता घडली आहे. या अपघातात तिघांची प्रकृती चिंताजनक असून 50 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे.
मेळघाटातील या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांवर सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत .हा अपघात अतिशय भयंकर आणि भीषण होता. यामध्ये पुलाचा कठडा तोडून बस थेट दरीत कोसळली आहे. ही बस खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची होती. ही बस सकाळी सहा वाजता अमरावती इथून धारणीला निघाली होती यावेळीच हा अपघात झाला आहे. या बसमधून 50 प्रवासी प्रवास करत होते यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.
सेमाडोह वळणावरील दरी प्रचंड खोल आहे यामुळेच या बसमधील प्रवाशांना बाहेर काढणेही कठिण जात आहे. बसच्या खिडकीतून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच दरीत पाणी असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. या अपघातामुळे सेमाढोह परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे. हा अपघात घडल्यानंतर परतवाडा, चिखलदरा आणि धारणी येथील पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. यानंतर अपघातस्थळी परतवाडा, चिखलदरा आणि धारणी या तिन्ही शहरातून बचाव पथक रावना झाले आहेत.
घटनास्थळी स्थानिक रहिवासी यांनी देखील मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान, वळण रस्त्यावरील सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच वाहन चालकांनी वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा अपघाताच्या घटना आपण टाळू शकतो.