Atishi Marlena : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या खुर्चीवर बसायचे ती खुर्ची रिकामी ठेवण्यात आली. केजरीवाल यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामीच राहणार असल्याचे आतिशी यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आतिशी म्हणाल्या की, ‘मी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रभू राम 14 वर्षांच्या वनवासात गेले आणि भरतला पदभार स्वीकारावा लागला तशीच माझीही अवस्था आहे. ज्याप्रमाणे भरतने प्रभू राम यांच्याजागी 14 वर्षे पदभार स्वीकारला, त्याचप्रमाणे पुढील चार महिने मी दिल्ली सरकार चालवणार आहे.’
पुढे त्या म्हणाल्या, ‘अरविंद केजरीवाल यांनी शिष्टाचार आणि नैतिकतेचा आदर्श घालून दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाजपने अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा डागाळण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. जोपर्यंत दिल्लीतील जनतेचा त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास बसत नाही तोपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाहीत. मला आशा आहे की दिल्लीची जनता त्यांना पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून देईल. तोपर्यंत अरविंद केजरीवालांची खुर्ची तशीच राहील. असं त्यांनी म्हंटल आहे.
21 सप्टेंबरला घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
आम आदमी पार्टीच्या (AAP) नेत्या आतिशी यांनी 21 सप्टेंबर 2024 रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या. शपथ घेतल्यानंतर अतिशी यांनी सर्वप्रथम अरविंद केजरीवाल यांच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी म्हणाल्या, ‘अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील. जोपर्यंत त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी राहतील तोपर्यंत त्या दिल्लीच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी पूर्ण निष्ठेने काम करत राहतील. आतिशी यांच्यासह पाच कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. ज्यामध्ये गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश आहे.
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत पण त्यांचा कार्यकाळ पाच-सहा महिन्यांचा असणार आहे. फेब्रुवारीमध्ये राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत आम आदमी पार्टीने त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवले आहे. आतिशी यांनी मुख्यमंत्री होताच जाहीर केले होते की, ‘दिल्लीचे एकच मुख्यमंत्री आहेत आणि ते म्हणजे अरविंद केजरीवाल.’