Badlapur : महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत अक्षय शिंदेला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला, या घटनेत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. कालच्या या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काऊंटर प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी पंजाब राव उगले यांना एसआयटीचे प्रमुख करण्यात आले आहे. एसआयटीमध्ये एकूण 8 जणांचा समावेश आहे.
एन्काऊंटर कसा झाला?
शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेला त्याच्या माजी पत्नीने नोंदवलेल्या आणखी एका गुन्ह्याच्या तपासासंदर्भात सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरला नेले जात असताना, त्याने पोलीस कर्मचाऱ्याकडून रिव्हॉल्वरवर (बंदूक) हिसकावली आणि गोळी झाडली, प्रत्युत्तरात पोलिसांनी बचावासाठी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या.
या घटनेनंतर त्याला कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विरोधी पक्षांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत या प्रकरणाची व्यापक आणि न्यायालयीन चौकशीची मागणी केली असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ आरोपींना गोळ्या झाडल्या. आरोपींनी केलेल्या गोळीबारात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक (एएसआय) जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पोलीस पथक त्याला बदलापूरला नेत असताना सायंकाळी 6 ते 6.15 च्या दरम्यान पोलिसांचे वाहन मुंब्रा बायपासवर असताना अक्षय शिंदे (24) याने एपीआय नीलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी मोरे यांच्या पायात लागली. आणखी दोन गोळ्या इकडे तिकडे गेल्या.
स्वसंरक्षणार्थ पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने आरोपीवर गोळी झाडली, त्यात तो जखमी झाला. एपीआय मोरे व शिंदे यांना कळवा नागरी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मोरे यांना ज्युपिटर रुग्णालयात पाठवले. तर कळवा नागरी रुग्णालयातील डॉक्टरांनी शिंदेला मृत घोषित केले.
त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याचवेळी आरोपी अक्षय शिंदेच्या आई आणि काकांनी ही घटना एन्काउंटर असल्याचे सांगत न्यायाची मागणी केली.
अक्षय शिंदेला ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपाअंतर्गत अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर निदर्शने केली होती. तसेच आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली होती.
काल घडलेल्या घटनेवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले, ‘पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्या. अक्षय शिंदेच्या माजी पत्नीने त्याच्यावर लैंगिक हिंसाचाराचे आरोप केले होते आणि या आरोपांच्या संदर्भात पोलीस त्याला चौकशीसाठी घेऊन जात होते. यावेळी त्याने एका पोलिसाची बंदूक हिसकावून घेतली आणि गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. असे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.