Maharashtra Cabinet Decisions : काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 24 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा देखील निर्णय घेण्याला आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. राज्याच्या ग्रामविकास खात्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण सहा प्रस्ताव मांडले होते. त्यात सरपंच, उपसरपंचांच्या मानधन वाढीचाही प्रस्ताव होता. इतर प्रस्तावांसोबत हा प्रस्तावही मान्य करण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता सरकारच्या तिजोरीवर ११६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
आता किती मिळणार मानधन ?
राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचाचे सध्याचे मानधन त्या-त्या ग्रामपंचायतीतील लोकसंख्येवर आधारित आहे. त्यानुसार, ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० पर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये होणार आहे. तर, या ग्रामपंचायतींच्या उपसरंपचाचे मानधन १ हजार रुपयांवरून २ हजार रुपये होणार आहे.
तसेच दोन हजार ते आठ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे मानधन ४ हजारांवरून ८ हजार रुपये होणार आहे. तर, उपसरपंचांचे मानधन दीड हजार रुपयांवरून ३ हजार रुपये होईल.
ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचांचे मानधन ५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये तर, उपसरपंचांचे मानधन २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये होणार आहे.