Badlapur School Crime : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. मात्र, या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधकांकडून देखील यावर प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी सीयायडीची एंट्री झाली आहे. या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर एन्काऊंटरचा तपास सीयायडी सोपवण्या आला आहे.
या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरु केला असून सीआयडी अधीक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार आहेत. सीआयडीचे पथक मंगळवारी ठाण्यात दाखल होणार आहे, आणि पुढील तपासाला सुरुवात करणार आहे.
बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेंच्या कोर्टासमोर सुनावण्या सुरु होत्या. मात्र, सोमवारी त्याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी आली. सुरुवातीला त्याने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळी चालवल्याचे म्हंटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोलीस पथक आरोपी अक्षय शिंदेला बदलापूरला नेत असताना सायंकाळी 6 ते 6.15 च्या दरम्यान पोलिसांचे वाहन मुंब्रा बायपासवर असताना अक्षय शिंदे (24) याने एपीआय नीलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळ्या झाडल्या यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळ्या चालवल्या या घटनेत आरोपी शिंदेचा मृत्यू झाला.