आगामी विधानसभा निवडणूका (Vidhansabha Elections 2024) तोंडावर आल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) उद्या (२६ सप्टेंबर) रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक विकास कामांचे उद्धघाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भुयारी मेट्रोचे उद्धाटन तसेच स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा विमानतळ ते एस. पी. महाविद्यालय तसेच गणेशखिंड या मार्गावरून जाणार असून आता त्या मार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम चालू आहे. उद्या संध्याकाळी 5.35 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर येणार आहेत. यानंतर ते शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनला जाणार आहेत. तेथे गेल्यानंतर पंतप्रधानांकडून शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
यानंतर पंतप्रधान स्वत; मेट्रोने प्रवास करत शिवाजीनगरवरून स्वारगेटला येणार आहेत. स्वारगेटला पोहचल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर एसपी कॉलेज येथे सभास्थळी 6.30 वाजता पंतप्रधान पोहचणार आहेत. त्याठिकाणी ते जनतेशी संवाद साधतील. यानंतर पंतप्रधान 7.55 मिनिटांनी पुणे विमानतळाहून दिल्लीला जाणार आहेत. पंतप्रधानांची एसपी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेत काय बोलणार ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या स्वागताचे बॅनर जागोजागी लावलेले आहेत.