बदलापूर (Badlapur ) येथे ३ आणि ४ वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर बदलापुरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास बदलापूर येथील स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. यामुळेच आता अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करण्यात येणार ? हा प्रश्न आहे.
दोन दिवसांपूर्वी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला होता यांनतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला होता. आज त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबियांकडून हा एन्काउंटर जाणूनबुजून केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी अक्षयच्या वडिलांकडून करण्यात येत आहे.
अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकिल अॅड अमित कटारनवरे यांनी अक्षयच्या मृतदेहाचे दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरण्यात येणार आहे अशी माहिती सांगितली आहे. आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे. यामुळे मृतदेहाचे दहन करणार नाही तर तो पुरणार आहोत. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल यामुळे मृतदेह पुरणार आहोत असे अक्षय शिंदेच्या कुटुंबाकडून म्हटले जात आहे.
पण आता अक्षय शिंदे याचा मृतदेह पुरण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही अशी त्याच्या कुटुंबीयांनी कोर्टात तक्रार केली आहे. यांनतर राज्य सरकार आणि सरकारी वकीलांनी मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळवून देणार असल्याचे कोर्टाला आश्वासन दिलेले आहे.