पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) आज पुणे (Pune ) आज पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान अनेक विकास कामांचे उद्धघाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार होते. स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार होते.
तसेच पंतप्रधानांकडून शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता.पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेटच्या भूमिगत मेट्रोचा लोकार्पण सोहळा देखील पार पडणार होता. यासह एकूण बारा प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते.
पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठीची जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती. परंतु पुण्यामध्ये प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जिथे मोदी भाषण करणार होते, त्या मैदानावर जोरदार पावसामुळे पाणी साठलेले आहे. प्रशासनाने हे मैदान कोरडे करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. परंतु आता मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून लवकरच त्यांच्या पुणे दौऱ्याची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल. मुंबई, ठाणे पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे.
दरम्यान, पुढील 24 तासात प्रचंड पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळेच पालिका प्रशासनांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने पुण्याला रेड अलर्ट दिल्यानंतर पंतप्रधानांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.