Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने याबद्दल केंद्र सरकारला सवाल केला असून, यासंबंधित तपशील मागवला आहे.
राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते एस विघ्नेश शिशिर यांनी केली होती. त्यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठात सुनावणी सुरू आहे.
राहुल गांधींच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह
याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक असल्याचे अनेक कागदपत्रे आणि ब्रिटीश सरकारचे काही ई-मेल्स त्यांच्याकडे आहेत. अशा परिस्थितीत ते भारतात निवडणूक लढवण्यासाठी पात्र नाहीत.
राहुल गांधी यांचे दुहेरी नागरिकत्व धारण करणे हा भारतीय न्याय संहिता आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा असून गुन्हा नोंदवून सीबीआयला तपास करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, त्यांनी दुहेरी नागरिकत्वाबाबत सक्षम अधिकाऱ्याकडे दोन वेळा तक्रारी पाठवल्या, परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याने सध्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याच्या तक्रारीवर सक्षम अधिकाऱ्याने काय कारवाई केली, हे सांगण्यास न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले. त्यांच्याकडे ही तक्रार आली आहे का आणि त्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली? याबद्दलचा तपशील मागवण्यात आला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर होणार आहे.