Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. ही महिला पास न काढताच सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात (Mantralaya) घुसली आणि तिने कार्यालयाची तोडफोड केली. मात्र, मंत्रालयात सुरक्षाव्यवस्था असतानाही ही महिला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचलीच कशी? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता या सर्व प्रकरणावर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कार्यालयात तोडफोडीची घटना काल घडली आहे. तोडफोड करणाऱ्या महिलेचे काय म्हणणे होते, तिने असं का केलं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणत्या संतापाच्या भरात महिलेने कृत्य केलं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.” अशी प्रतिक्रिया फडवणीस यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून विरोधक देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका आहेत. विरोधकांकडून लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला असल्याची टीका करण्यात येत आहेत, यावरूनच फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता, ते म्हणाले, विरोधक इतके हताश झाले आहेत, त्यांच्याकडे मुद्दे उरलेले नाहीत. मला जर टीका करायची असेल तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो.
पुढे ते म्हणाले, ‘एखादी बहीण चिडली असेल तर तिची व्यथा आपण समजून घेऊ. परंतु कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तरीही त्या महिलेची बाजू समजून घेऊ, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.