Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) गुरुवारचा पुणे दौरा पावसामुळे रद्द करण्यात आला. २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील अनेक विकास कामांचे उद्धघाटन होणार होते. मात्र, पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींच्या येण्याची वाट न पाहता मेट्रो नागरिकांसाठी तातडीने खुली करावी, यासाठी आंदोलनं केली.
दरम्यान, दोन दिवसांपासून मेट्रोच्या उद्घाटनावरून सुरु असलेल्या राजकारणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मेट्रो, भिडे वाडा आणि इतर विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन 26 सप्टेंबर रोजी होणार होते. त्यासाठीची सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती. मात्र, पावसामुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील मनाचे आहेत. पाऊस सुरू असताना जर त्यांचा दौरा झाला असता तर नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले असते. वाहतूक कोंडीचाही लोकांना त्रास सहन करावा लागला असता, त्यामुळे संवेदनशीलता दाखवत त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, विरोधकांनी याच राजकारण सुरू केलं. उद्घाटन केलं असतं तर विरोधक म्हणाले असते, लोकांना त्रास देऊन उद्घाटन केलं. आणि लोकांना आता त्रास होऊ नये म्हणून उद्घाटन कार्यक्रम रद्द केला तर विरोधक तिकडूनही बोलत आहे. त्यामुळे विरोधकांकडून दोन्हीकडून वाजवण्याचे प्रकार सुरू आहेत. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.