Jamaican PM : जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस (Andrew Holness) ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत भारत दौऱ्यावर असतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे निमंत्रण स्वीकारून ते उद्या पासून तीन दिवस भारत दौऱ्यावर असतील. यासंबंधीची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
नुकतेच परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस हे पहिल्यांदाच भारतात येत आहेत. त्यांची पहिलीच भारत भेट असेल आणि जमैकाच्या पंतप्रधानांची भारतातील पहिली द्विपक्षीय भेटही असेल. याआधी पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान हॉलनेस यांची बहुपक्षीय बैठकांमध्ये अनेकदा भेट झाली आहे.
या भेटीदरम्यान, हॉलनेस पंतप्रधान मोदींसोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. मोदींसोबत चर्चा झाल्यानंतर हॉलनेस, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची देखील भेट घेतील. या भेटीमुळे हॉलनेस यांना इतर मान्यवरांना भेटण्याची आणि व्यवसाय आणि उद्योगातील नेत्यांशी संवाद साधण्याची संधीही मिळेल. या भेटीदरम्यान द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यासाठी अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.’
निवेदनात असेही म्हंटले आहे की, ‘भारत आणि जमैकामधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत आहेत, जे त्यांच्या सामायिक वसाहतवादी भूतकाळात, लोकशाही आणि स्वातंत्र्याची मूल्ये आणि क्रिकेटची आवड यातून दिसून येतात. या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, आर्थिक सहकार्य वाढेल तसेच जमैका आणि भारत यांच्यातील दीर्घकालीन संबंध आणखीनच मजबूत होतील.’
याआधी ५ जून रोजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जमैकाच्या त्यांच्या समकक्ष कामिना जॉन्सन स्मिथ यांचे आभार मानले होते, ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाबद्दल अभिनंदन केले होते आणि त्यांनी द्विपक्षीय सहकार्य आणि जागतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील म्हंटले होते.
जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस यांनी देखील पंतप्रधान मोदींचे तिसरे कार्यकाळ सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले होते. “पंतप्रधान @narendramodi यांचे भारताचे सरकार प्रमुख म्हणून ऐतिहासिक तिसरा कार्यकाळ सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन,” असे हॉलनेस यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले होते. याला उत्तर देताना, पंतप्रधान मोदींनी जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस यांचे आभार मानले आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे देखील म्हंटले.’