Balochistan : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला आहे. रविवारी बलुचिस्तानमध्ये झोपलेल्या पंजाबमधील मजुरांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. रात्री काम करून झोपलेल्या या मजुरांवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हे मजूर पंजगुर शहरातील खुदा-ए-अबादान भागात एका घराच्या बांधकामात गुंतले होते. दिवसभर काम केल्यानंतर सर्व कामगार एकाच छताखाली झोपले असताना संशयित दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.
हे सर्व पंजाबमधील मुलतान जिल्ह्यातील रहिवासी असल्याची स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिस महानिरीक्षक मोअज्जम जाह अन्सारी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘गोळीबारात सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला आहे. साजिद, शफीक, फैयाज, इफ्तिखार, सलमान, अशी मृतांची नावे आहेत.” दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदरी स्वीकारलेली नाही.
पाकिस्तान पोलिसांकडून तपास सुरु
पंजगुरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक फाजील शाह बुखारी म्हणाले की, ‘हा दहशतवादी हल्ला होता आणि याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेबाबत पंतप्रधानांनी बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांच्याकडूनही अहवाल मागवला आहे. शरीफ यांनी या घटनेमागे कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलणार असल्याचे सांगितले आहे.
तुमच्या माहितीसाठी, गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तान प्रांतातील पंजाबमधील कामगारांना दहशतवादी सातत्याचे लक्ष्य करत आहेत. ऑगस्टमध्ये बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेलमध्ये दहशतवाद्यांनी 23 जणांचा बळी घेतला होता. सशस्त्र दहशतवाद्यांनी ट्रक आणि बसमधून प्रवाशांना खाली उतरवून त्यांची ओळख विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.