India Vs China : भारत आणि चीन सीमेवरील परिस्थितीबाबत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी मोठे विधान केले आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवरील परिस्थिती संवेदनशील असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांनी सीमेवरील परिस्थिती ‘स्थिर’ आहे परंतु ती एप्रिल 2020 पूर्वीची परिस्थिती पूर्ववत व्हावी अशी भारताची इच्छा आहे.
एप्रिल 2020 मध्ये, चीनने भारताच्या सीमेवर अतिक्रमण करायला सुरुवात केली होती आणि भारताची जागा घेण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र, सीमा भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. चीनच्या सततच्या प्रयत्नांमुळे पूर्व लडाख आणि इतर सीमा भागात तणाव कायम आहे.
चीनच्या या कारवायांमुळे भारतासोबतच्या राजनैतिक संबंधांनाही हानी पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनसोबतचे भारताचे संबंध ‘बिघडलेले’ असल्याचे वर्णन केले होते. जोपर्यंत सीमेवरील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत संबंध सामान्य होणार नाहीत, असे त्यांनी म्हंटले होते.
Army Chief General Upendra Dwivedi has said that the situation along the Line of Actual Control (LAC) with China is stable but not normal. India wants to restore the situation to its pre-April 2020 status, prior to the military standoff that began in May 2020.
— All India Radio News (@airnewsalerts) October 1, 2024
भारत चीन सीमा वादाविषयी पुढे बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, ‘सीमा रेषेवर भारत आणि चिनी सैन्यांमधील विश्वासाचा ‘सर्वात मोठा तोटा’ झाला आहे. ज्यापर्यंत चीनचा संबंध आहे, तो बऱ्याच काळापासून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. चीनसोबतची आजची परिस्थिती विचारली असता द्विवेदी म्हणाले, ‘सध्या परिस्थिती स्थिर आहे, परंतु संवेदनशील आहे. एप्रिल 2020 पूर्वी जी परिस्थिती होती ती परत यावी अशी आमची इच्छा आहे, परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत परिस्थिती संवेदनशील राहील. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.’ असेही द्विवेदी म्हणाले आहेत.
या परिस्थितीत वर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर चीनचे सैन्य काही प्रमाणात मागेही हटले आहेत. मात्र, सीमावाद पूर्णपणे सुटलेला नाही. दरम्यान, मागील महिन्यांतच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी रशियामध्ये भेट घेतली होती, या भेटीत दोन्ही देशांतील तणावाबाबत चर्चा करण्यात आली.