Nitin Gadkari : नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) लाडकी बहीण योजनेबाबत एक वक्तव्य केलं होत. त्यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ती गडकरींची स्टाईल आहे. ही योजना बजेटच्या बाहेरची नाही. राज्य सरकारच्या सर्व योजना बजेटमध्ये आहेत. पगार किंवा इतर योजनांकरता अडचण नाही. हे सर्व पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवले आहेत. योजनेला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पोटात जोरात दुखायला लागल्याने ते रोज संभ्रम निर्माण करतात. काहीही बंद होणार नाही. सर्व चालणार आहे.
नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी नुकतेच नागपूरमध्ये राज्य सरकारच्या सर्वात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केले होते. नागपुरात आयोजीत केलेल्या‘Advantage Vidarbha’ या उद्योजकांसाठीच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत असताना म्हणाले, ‘उद्योजकांनी सरकारच्या अनुदानाच्या पैशांवर अवलंबून राहू नये कारण सध्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर मोठा खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही.’ त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत होत्या. यावरच फडणवीस यांनी प्रतिक्रिया देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
दरम्यान, नितीन गडकरींच्या त्याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हंटल्या, ‘नितीन गडकरी राज्याच्या राजकारणात आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते. ते काय बोलले हे मला माहीत नाही. पण नागपूरमधील कार्यक्रमात त्यांनी या योजनेचे कौतुक केले होते, असं त्या म्हणाल्या.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेचे दोन हप्ते मिळाले असून, अजूनही दुसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत अडीच कोटी लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा महायुती सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.