Amit Shah : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही महाराष्ट्रात पोहोचून मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी अमित शहांनी महाराष्ट्रात ‘महायुती’चे सरकार येणार असल्याचा दावा केला.
महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत अमित शहा म्हणाले की, ‘2024 मध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. महायुतीला रोखण्याची ताकद कोणत्याही पक्षात नाही. पुढे त्यांनी महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू, असेही म्हंटले आहे. देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करत शाह म्हणाले, ‘फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यास सक्षम आहेत.’
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे अमित शहा यांनी मुंबईतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. यावेळी शहांनी निवडणुकीमध्ये पूर्ण उत्साहाने काम करण्याचा सल्ला देखील कार्यकर्त्यांना दिला आहे. पुढे त्यांनी कार्यकर्त्यांमधील अंतर्गत मतभेदावरही भाष्य केले. घराघरात वाद असतात. तसंच विधानसभेतही आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमधील मतभेद दूर करा. काम करताना वाद होतोच, पण तो वाद संपवता आला पाहिजे. काही कामं कुणालाच करायची नसतात. पण, खरा कार्यकर्ता तेच काम करायला घेतो. परिवारात वाद असले तरी तो एकच असतो, असं शाह यांनी महायुतीत असलेल्या मित्रपक्षातील कार्यकर्त्यांना सांगितले आहे.