Gandhi Jayanti : आज (2 ऑक्टोबर) संपूर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (Gandhi Jayanti) साजरी करत आहे. यानिमित्ताने सर्वजण महात्मा गांधींच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत आहेत. तसेच, संपूर्ण देश महात्मा गांधींना आदरांजली वाहतो आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वांनी 155 व्या गांधी जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी राजघाटावर पोहोचले, जिथे त्यांनी बापूंना पुष्पहार अर्पण केला. तेथे ते काही काळ थांबले. त्याचवेळी पीएम मोदींनी X वर पोस्ट शेअर लिहिले की, ‘सर्व देशवासियांच्या वतीने आदरणीय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही विनम्र अभिवादन करतो. सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील.’ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी देखील महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाटावर त्यांना आदरांजली वाहिली.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही बुधवारी सकाळी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. राहुल गांधी यांच्या शिवाय इतरही अनेक बडे नेते राजघाटावर पोहोचले आणि राष्ट्रपितांचं स्मरण केलं.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गांधी जयंतीनिमित्त राजधानी लखनौमधील हजरतगंज येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता अभियानात देखील सहभाग घेतला. स्वच्छतेला अध्यात्माचा मार्ग असे सांगणाऱ्या ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा संदेशही दिला.
दरम्यान, लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, ज्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केले.’ दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावर आदरांजली वाहिली.
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता. त्यांचा जन्मदिवस, गांधी जयंती तसेच आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो. ब्रिटीश राजवटीपासून भारताला मुक्त करण्यासाठी त्यांनी लढा दिला. त्यांनी अहिंसक निषेधाचा शिकवलेला धडा आजही जगभरात आदराने स्मरणात आहे.