Arvind Kejriwal New : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडणार आहेत. केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता (Arvind Kejriwal resigns as CM). त्यानंतर आता ते दोन दिवसांत सिव्हिल लाइन्समधील 6, फ्लॅगस्टाफ रोड येथील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रिकामे करणार आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल यांनी सांगितले होते की, पितृपक्ष समाप्त होताच आणि नवरात्रोत्सव सुरू होताच, मुख्यमंत्री निवासस्थान सोडून नवीन ठिकाणी शिफ्ट होणार. त्यानुसार आता पुढील दोन दिवसात केजरीवाल मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडणार असल्याचे सांगितले जात आहे.
आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर केजरीवाल 2015 पासून मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहत आहेत. दरम्यान, जंतर मंतर येथे जाहीर सभेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले होते, ‘दिल्लीचा मुख्यमंत्री असूनही शहारत एक घर घेऊ शकलो नाही.’
या सभेत बोलताना केजरीवाल म्हणाले, “काही दिवसात मी सीएमचा बंगला सोडेन. आज मुख्यमंत्री होऊन 10 वर्षे झाली तरी माझ्याकडे दिल्लीत एकही घर नाही. बरेच लोक मला बोलतात मुख्यमंत्री साहेब, तुम्ही १० वर्षात १० बंगले बांधू शकलात, पण मी १० वर्षात काहीच कमावले नाही, मी फक्त तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कमावले आहे. या प्रेमाचा परिणाम म्हणजे आज मी सरकारी निवासस्थान सोडत असताना दिल्लीतील अनेक लोक मला त्यांची घरे भाड्याशिवाय देत आहेत. पितृ पक्ष संपल्यानंतर आणि नवरात्रीच्या सुरुवातीनंतर मी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडेन आणि तुमच्यासोबत, तुमच्यामध्ये राहायला येईल. असे म्हणाले होते.
डिसेंबर 2013 मध्ये पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्यापूर्वी केजरीवाल गाझियाबादच्या कौशांबी भागात राहत होते. मुख्यमंत्री असताना ते मध्य दिल्लीतील टिळक लेनमध्ये असलेल्या घरात राहत होते. फेब्रुवारी 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (AAP) प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यानंतर, ते उत्तर दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स भागातील 6, फ्लॅगस्टाफ रोड येथील निवासस्थानी राहायला गेले.