Israel Iran War : इराण (Iran) आणि इस्रायलमध्ये (Israel) आता चांगलेच युद्ध पेटले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. अशातच आता इस्रायलला समर्थन देणारा देश अमेरिकेने माघार घेण्याची घोषणा केली आहे. अशास्थितीत हा इस्रायलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
इराणने केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या प्रत्युत्तरात इस्रायल त्यांच्या न्यूक्लियर साइटवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या हल्ल्याचे समर्थन अमेरिका करणार नाही असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हंटले आहे.
इराणच्या हल्ल्याला इस्त्रायल जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे. त्यांना इराणची न्यूक्लियर साइट उडवायची आहे. मात्र ही माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा देण्यापासून माघार घेतली.
1 ऑक्टोबरच्या रात्री इराणने इस्रायलची राजधानी ‘तेल-अवीव’वर सुमारे 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलचे काही नागरिक मारले गेले. या हल्ल्यानंत इस्रायलने ताबडतोब नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्यास सांगितले, तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला थेट इशारा देत, देशावर हा हल्ला करून मोठी चूक केली असल्याचे म्हंटले. तसेच त्यांना याची किंमत चुकवावी लागेल असेही म्हंटले.
दरम्यान, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल इराणच्या न्यूक्लियर साइटला लक्ष्य करू शकते. मात्र, यापूर्वीच बायडेन यांनी इस्रायलला स्पष्ट इशारा दिला आहे की, त्यांनी असे केल्यास अमेरिका त्यांना पाठिंबा देणार नाही.
बायडेन यांच्या या घोषणेनंतरही इस्रायल इराणच्या न्यूक्लियर साइटवर हल्ला करणार का? हे आता येणारा काळच सांगेल. मात्र, अमेरिकेच्या या घोषणेनंतर इतर देशही इस्रायलचे समर्थन करतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ताबडतोब आपल्या सैन्याला इस्रायलला मदत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता या युद्धात महासत्ता अमेरिका काय भूमिका घेणार हे पाहण्याजोगे ठरेल.