सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते…..!
महाराष्ट्राला विविध सणांची परंपरा लाभलेली आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाले की सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते. बाप्पाचे विसर्जन झाले की चाहूल लागते ती म्हणजे नवरात्री या सणाची. नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी देवी दुर्गाच्या उपासनेसाठी नवरात्री हा सण साजरा केला जातो.
नऊ दिवसांच्या नवरात्रीचा हा काळ भक्तांना ध्यान साधनेसाठी प्रेरित करत असतो. विविध परंपरा असलेल्या नवरात्रीने भारतीय संस्कृतीला एकत्र आणले आहे. नवरात्रीचा हा काळ नवे प्रारंभ करण्यासाठी, व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात शुभ मानला जातो. तसेच नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे यादिवसात आपल्यामध्ये नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. नवरात्रीच्या काळात अनेक लोक एकत्र येतात, ज्यामुळे सामाजिक आपुलकी वाढते. दुर्गा मातेचा सन्मान व्हावा यासाठी हा सण साजरा केला जातो. हा सण नऊ दिवस साजरा केला जात असून यामध्ये नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते. शैलपुत्री ,ब्रह्मचारिणी ,चंद्रघंटा , कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दरवर्षी घटस्थापना केली जाते. या वेळी कलश स्थापना करण्याची परंपराच आहे. कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या ९ दिवसांची पूजा अपूर्ण मानली जाते. हा कलश पहिल्या दिवसांपासून ते नवव्या दिवसापर्यंत घरात ठेवला जात असून त्यानंतर हा कलशाचे दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते. कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगूण शक्तीचे प्रतीक मानले जाते. ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी-देवताचा वास असतो. कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानण्यात आले आहे. कलशाच्या मुखात विष्णू, गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्म देवाचा वास असतो असे म्हटले जाते. तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध, शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे असे देखील म्हटले जाते. घटस्थापना आणि आजपासून सुरु होत असलेल्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा!