Bangladesh : शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार होऊन देश सोडल्यानंतर बांगलादेशच्या मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतासह पाच देशांतील आपल्या राजदूतांना (राजदूत हा परदेशी राजधानीमध्ये किंवा देशात तैनात असलेला सरकारी प्रतिनिधी असतो.) परत बोलावले आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, पोर्तुगाल आणि संयुक्त राष्ट्रातून बांगलादेशच्या राजदूतांना परत बोलावण्यात आले आहे.
शेख हसीना पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. अशातच भारतातल्या राजदूताला देखील परत बोलवण्यात आले आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, ‘एका मोठ्या राजनैतिक फेरबदलात, अंतरिम सरकारने पाच देशांच्या राजदूतांसह भारतातील आपल्या राजदूतांना परत बोलावले आहे, या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाने ब्रुसेल्स, कॅनबेरा, लिस्बन, नवी दिल्ली आणि न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी मिशनमध्ये तैनात असलेल्या राजदूतांना तात्काळ ढाका येथे परतण्याचे आदेश दिले आहेत.
युनूस सरकारवर भारत नाराज
बांगलादेशात विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली सातत्याने निदर्शने सुरू होती. यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीला शेख हसीना यांचे सरकार पडले आणि त्यांना देश सोडावा लागला. या घटनेनंतर भारत-बांगलादेश संबंध बिघडले आहेत. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी हसीना पायउतार झाल्यानंतर काही दिवसांनी पदभार स्वीकारला. त्याचवेळी बांगलादेश सोडून हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. युनूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सभेच्या वेळी भेट घडवून आणण्यासाठी ढाक्यातील राजवटीने सतत प्रयत्न केले. मात्र, युनूस यांनी भारतावर टीका करत शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाचा मुद्दाही उपस्थित केला होता. यावर भारतीय पक्ष नाराज होता आणि म्हणूनच दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही.