Devendra Fadnavis : या लोकांना सावरकरांबद्दल काहीच माहिती नाही. ते प्रत्येक वेळी सावरकरांचा अनादर करतात. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सावरकरांबद्दल चुकीची विधाने करायला सुरुवात केली होती आणि हे लोक ते पुढे करत आहेत. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी सावकरांबद्दल केलेल्या वादग्रस विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसवर टीका करत दिनेश गुंडू राव यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. सावरकर ब्राह्मण असूनही मांसाहारी असल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर मोहम्मद अली जिनांपेक्षा जास्त कट्टरपंथी असे सावरकरांचे त्यांनी वर्णन केले. मंत्री गुंडू राव यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रया देत म्हंटले, ‘या लोकांना सावरकरांबद्दल काहीच माहिती नाही. ते प्रत्येक वेळी सावरकरांचा अनादर करतात. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल चुकीची विधाने करायला सुरुवात केली होती आणि हे लोक ते पुढे करत आहेत. पुढे ते म्हणाले, ‘सावरकरांनी गायींवर आपले विचार खूप चांगल्या पद्धतीने समोर ठेवले आहेत. ते म्हणाले आहेत, शेतकऱ्यांच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत गाय ही त्यांना मदत करते यामुळे आम्ही गायीला देवाचा दर्जा दिला आहे. असं फडणवीस यांनी म्हंटले आहे.
दिनेश गुंडूराव यांच्या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवत काँग्रेस ही खोट्याची फॅक्टरी असल्याचे म्हटले आहे. भाजप नेते अनुराग ठाकूर म्हणाले, “वीर सावरकरांचा अपमान भारत सहन करणार नाही. देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या वीर सावरकरांकडून काँग्रेसने कधीच काही शिकले नाही. वीर सावरकरांचा अपमान करून त्यांनी काँग्रेसच्या काळात स्वातंत्र्यसैनिकांचा आदर नसल्याचे दाखवून दिले आहे. देशाचे तुकडे करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात समाविष्ट करून राहुल गांधी ‘तुकडे-तुकडे’ विचारधारा पुढे नेत आहेत आणि परदेशात देशाबद्दल वाईट बोलत आहे, ” अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.