Womens T20 World Cup 2024 : महिला T20 World Cup 2024 ला आजपासून सुरुवात झाली आहे. दुबई आणि शारजाह येथे खेळल्या जाणाऱ्या महिला T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या दिवशी आज (03 ऑक्टोबर) दोन सामने पाहायला मिळतील. स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंडच्या महिला संघांमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या महिला संघांमध्ये होणार आहे.
बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना शारजाहमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता झाले आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना शारजाहमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल. टीम इंडियाचा या स्पर्धेतील पहिला सामना रविवार, 4 ऑक्टोबर रोजी होणार असून, टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडच्या संघाशी होणार आहे.
आजपासून सुरू होत असलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 18 दिवसांत एकूण 23 सामने पाहायला मिळणार आहेत. याआधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती, पण तिथली परिस्थिती लक्षात घेऊन आयसीसीने ती थेतून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि आता ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
भारताचे सामने
दरम्यान, भारताचा पहिला सामना न्यूझीलंड सोबत होणार असून दुसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ९ ऑक्टोबरला सामना होणार आहे. भारताचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडिया पहिले तीन सामने दुबईत खेळणार आहे. चौथा सामना शारजाह येथे होणार आहे.
महिला T20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना 17 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. दुसरा उपांत्य सामना 18 ऑक्टोबर रोजी शारजाह येथे खेळवला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे.